पठाणकोट (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि खूनप्रकरणाचा निकाल आज, सोमवारी विशेष न्यायालयात लागणार आहे. या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे.
कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला काही महिन्यांपूर्वी ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेड कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांचा समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने झाली होती. दरम्यान, ठाणकोट न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी 3 जून रोजी झाली होती. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तेजविंदरसिंग यांनी दहा जून रोजी निकाल देऊ, असे सांगितले होते.