इस्लामाबाद (वृत्तसंस्था) हिंदू मुलींना पळवून त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटनेनंतर पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी आणखी एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बचावासाठी बनवलेल्या बंकरांमध्ये काश्मीरी महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा गौप्यस्फोट एका पिडीत महिलेने केला आहे. धक्कादायक म्हणजे २००५ मधील भुकंपानंतर सुरु झालेले हे अत्याचार अद्यापही सुरुच आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य स्थितीवेळी नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बंकर उभारण्यात आले आहेत. या बंकरांमध्ये २००५ मध्ये भूकंप झाल्यावर लोकांना निवारा देण्यात आला होता. या काळापासून महिलांचे अपहरण करण्यात येत असून या बंकरांमध्ये त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे.
पाकिस्तानी मिडीयानुसार या शिबिरांमध्ये आणि बंकरांमध्ये महिलांसोबत जे झाले त्याची चर्चा पूर्ण काश्मीरमध्ये ऐकायला मिळते. यामुळे या भागातील महिला सरकारच्या तात्पुरत्या निवाऱ्यापेक्षा इस्लामाबादला जाण्यास इच्छुक असतात. मात्र, काहीच कुटुंबे आजपर्यंत तिकडे जाऊ शकली आहेत.
पाकिस्तानने १९९० मध्येच या भागात निवाऱ्यासाठी बंकर बनविले आहेत. १३ बाय ७ फूट असा या बंकरांचा आकार आहे. सीमेवर गोळीबार सुरु झाल्यास या ठिकाणी २० ते ३० लोकांना ठेवण्यात येते. मात्र, इतर काळात हे बंकर महिलांच्या लैंगिक शोषणाचे अड्डे बनले आहेत. सीमेजवळ राहणाऱ्या महिलांना गोळीबारापासून वाचण्यासाठी या बंकरांचा आधार घ्यावाच लागतो.
या अत्याचाराबाबत कोणीही अद्याप तक्रार केलेली नसून पीओकेच्या नीलम घाटीतील एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर हा धक्कादायक खुलासा केला आहे. १९९० मध्ये बऱ्याचदा महिलांवर अभद्र टीप्पणी केली जायची. मात्र, याकडे महिला दुर्लक्ष करायच्या. मात्र नंतर स्थानिक लोक आणि सैनिकांकडून या महिलांना, तरुणींना पळवून नेले जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. याबाबत जर कुणाशी बोलणे केले तर बदनामी होऊन या मुलींशी लग्न कोण करणार ? या भीतीने याकडे कोणी लक्ष देत नव्हते. या पिडीत महिला सध्या आयुष्य तणाव, संकटात घालवत आहेत.