
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित ‘कारवां-२०२६’ आणि ‘कलासंगम’ या बहुप्रतिक्षित सांस्कृतिक महोत्सवांचा दिमाखदार समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सात दिवस चाललेल्या या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत कला, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

१९ ते २५ मार्च २०२६ दरम्यान आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. टी. वग्गे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी दीपक चांदोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सुरुवातीपासूनच कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पहिल्या दिवशी Open Mic, Poetry, Fishpond आणि Dance या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर, नाट्यप्रयोग, Mime आणि Orchestra यांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, टीमवर्क आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडले. तिसऱ्या दिवशी ‘कलासंगम’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविधतेतील एकतेचा प्रभावी आविष्कार सादर केला.
समारोप सोहळ्यास प्रसिद्ध वास्तुविशारद आणि ज्येष्ठ समाजसेवक भरतदादा अमळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा योग्य वापर, वेळेचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. आधुनिक युगात कौशल्यांसोबत जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
समारोपाच्या दिवशी हास्य कवी संमेलन, नृत्य स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळ्याने वातावरण रंगतदार झाले. विभागीय नृत्य स्पर्धेत यंत्र अभियांत्रिकी विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. ‘कलासंगम’ स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांनी सांघिक विजेतेपद मिळवले, तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी उपविजेतेपद मिळवले.
२५ मार्च रोजी पार पडलेल्या विनोदी कवी संमेलनात सुप्रसिद्ध कवी अशोक नायगांवकर यांनी आपल्या खुमासदार कवितांनी उपस्थितांना खळखळून हसवले. त्यांनी दैनंदिन जीवनातील वास्तव आणि विरोधाभास प्रभावीपणे मांडले. तसेच डॉ. राजा धर्माधिकारी, डॉ. मनीषा साधू आणि डॉ. मनीष खरगोनकर यांनीही आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली. “जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, पण आपली संस्कृती विसरू नका,” असा संदेशही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेतर्फे जनरल सेक्रेटरी दुर्गेश पाटील, सांस्कृतिक सचिव सुनेत्र बडगुजर, महिला प्रतिनिधी धनश्री मोरे, क्रीडा सचिव कृष्णा उदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
समारोपावेळी आयोजकांनी हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आणि नव्या संधींचा प्रारंभ असल्याचे सांगितले. “जिंकणे महत्त्वाचे असले तरी सहभागी होणे आणि स्वतःला घडवणे अधिक महत्त्वाचे आहे,” असा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



