जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरु केलीय. परंतु इच्छुक असलेले बहुतांश जण गटबाजीत अडकलेले आहेत. काही जणांचा तर एकमेकाच्या नावाला टोकाचा विरोध आहे. त्यामुळे पारोळ्याचे लोकनियुक्त करण पवार यांची लॉटरी लागण्याची शक्यता बळावली आहे. गटबाजीचा फटका नको तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून भाजप पक्षश्रेष्ठी देखील पवार यांच्या नावावर गंभीररित्या विचार करत असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे विद्यमान खासदार ए.टी.पाटील, आ.स्मिताताई वाघ व अभियंता प्रकाश पाटील हे देखील जोर लावून आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी मुंबई येथे भाजपच्या बैठकीत विचारविनिमय करून केंद्रीय बोर्डाकडे तीन जणांची नावं पाठविली आहेत. त्यात विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांच्यासह आमदार स्मिताताई वाघ , पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार व अभियंता प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. या तिघं नावांसह एक गोपनीय अहवाल देखील दिल्लीला पाठविण्यात आला असून कोणता उमेदवार राहिल्यास काय फायदा आणि काय नुकसान होऊ शकते?, याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, कोणता उमेदवार राहिल्यास, कोण अंतर्गत कुरघोडी करू शकतो?,याची देखील माहिती देण्यात आली आहे. एकंदरीत या अहवालात करण पवार यांच्याबाबतीत गटबाजीचे नकारात्मक मुद्दे नाहीय. त्यांची उमेदवारी जाहीर केल्यास इतर इच्छुक उमेदवारांकडून टोकाचा विरोध होण्याचा धोका नसल्याचेही अहवालात नमूद असल्याचे देखील कळते.
करण पवार हे माजी आमदार भास्कर पाटील यांचे नातू आहेत. करण पवार हे आधी राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीकडून ते नगरध्यक्ष देखील राहिलेले आहेत.त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषद सदस्य तथा जिल्हा बँक संचालक राहिलेले आहेत. करण पवार यांचा राष्ट्रवादीतील मित्रांचा गोतावळा लक्षात घेता, ते प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतात. दुसरीकडे करण पवार हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीशअण्णा पाटील यांचे पुतणे आहेत. यानिमित्ताने भाजपकडून राष्ट्रवादीची गोची करण्याची व्यव्हरचना देखील आखलेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आज दिल्लीत या सर्व नावांवर चर्चा होणार असल्याचे कळते. एकंदरीत गटबाजीचा विषय पक्षाने गांभीर्याने घेतल्यास फ्रेश उमेदवार म्हणून करण पवार यांची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी भाजपचा संभाव्य उमेदवार कोण असेल हे येणारा काळच सांगेल.