रोटरी क्लब खामगांवद्वारे “कर लो माईक से दोस्ती” कार्यक्रम उत्साहात

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मनात अशी भीती असेल तर किंवा स्टेज फिअर (Stage Fear) घालवण्यासाठी काय करता येईल याबद्दल काही सोप्या टिप्स देण्यासाठी रोटरी क्लब खामगांवद्वारे नुकतेच स्थानिक मोहता महिला महाविद्यालय येथे “कर लो माईक से दोस्ती” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब खामगांव आपल्या सदस्यांचे व्यक्तिमत्व विकास व्हावे यासाठी सतत कार्यरत असते आणि त्या अंतर्गतच “याराना ग्रुप” ने या कार्यक्रमाची आखणी केली होती.

बोलणं ही समोरच्यावर प्रभाव पाडणारी कला आहे. तुमच्या बोलण्यावरून समोरचा तुमच्याबद्दलचं मत तयार करतो. करिअर म्हणून नाही, तर व्यवहारात सगळ्याच ठिकाणी संवाद कौशल्य आवश्यक असतं. कधी स्टेजवर जाऊन, तर कधी चारचौघांमध्ये बसून बोलण्याची गरज पडते. त्यावेळी तुमच्यात स्टेज डेअरिंग म्हणजे सभाधीटपणा किती आहे, हे लक्षात येतं. एखादा मुद्दा व्यवस्थितपणे तुम्ही मांडू शकता की नाही, श्रोत्यांवर तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडतो की नाही, हे सगळं तुम्ही किती व्यवस्थित बोलता, यावरच अवलंबून असतं. अर्थात हे प्रत्येकाला जमतंच असं नाही. बोलण्याचं कौशल्य असलेले लोकच आपला विचार दुसऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहचवू शकतात. इतरांना मात्र कायमच इतकं छान कसं बोलावं, असा प्रश्न पडतो. अनेकदा संभाषण कौशल्य नसल्यामुळे मनातील गोष्टीही समोरच्याला सांगण्याची अडचण होते. असे मार्गदर्शन मान्यवरांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

सदर कार्यक्रमासाठी जेसीज ग्रुपच्या ख्यातीप्राप्त राष्ट्रीय प्रशिक्षिका हरप्रीतकौर बग्गा यांच्या सेवा प्राप्त झाल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. रोटरी क्लब अध्यक्ष रो सुरेश पारीक व मानद सचिव रो आनंद शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  हरप्रीतकौर बग्गा यांचा परिचय रो विनीत लोडाया यांनी करुन दिला तर कार्यक्रमाची रूपरेषा रो विशाल गांधी यांनी उपस्थितांना समजावून सांगितली.  हरप्रीतकौर बग्गा यांनी पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे महत्वपूर्ण मुद्दे समजावून सांगितले आणि उपस्थितांकडून प्रात्यक्षिके करवून घेतली. त्यामुळे आजपर्यंत कधीही माईकसमोर न आलेल्या लोकांनीदेखील उत्स्फूर्तपणे मंचावर येऊन भाषण देण्याचे प्रयत्न केले आणि ब-याच अंशी त्याची भीती गेलीदेखील. लोकांच्या मनावर या कार्यक्रमाचा एवढा पगडा बसला कि त्यांनी दोन तासांऐवजी सदर कायर्क्रम पूर्ण दिवसासाठी आयोजित करण्यात यांवा असे सुचविले.

हरप्रीतकौर बग्गा यांना मदतनीस म्हणून सारिका नवघरे व श्रुती नाथानी यांनी मोलाची भूमिका निभावली. कार्यक्रमाच्या शेवटी पाहुणचार म्हणून अल्पोपहार व कॉफीचे नियोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे अतिशय रोचक असे आभारप्रदर्शन हर्षल गुप्ता व तदनंतर आनंद शर्मा यांनी केले. यावेळेस सुमारे ४५ रोटरी सदस्यांची उपस्थिती सदर कार्यक्रमाला लाभली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी याराना ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content