Home क्राईम कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी, दोनदा गोळीबारानं खळबळ

कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी, दोनदा गोळीबारानं खळबळ


मुंबई– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  कॉमेडी जगतातील सर्वात लोकप्रिय चेहरा कपिल शर्मा याच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’वर दोनदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अभिनेता सलमान खानसोबतच्या जवळिकीनं कपिलला ही किंमत मोजावी लागत असल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारामागे थेट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची कबुली देणारा ऑडिओही समोर आला आहे, ज्यात या धमक्यांचा उगम आणि उद्देश उघड केला गेला आहे.

नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात कपिलने सलमान खानला पाहुणा म्हणून आमंत्रित केलं होतं. हेच बिश्नोई गँगला खटकलं. गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर याने आपल्या ऑडिओ संदेशात स्पष्ट केलं की कपिलने सलमान खानला शोमध्ये घेऊन त्यांच्या ‘वैरात’ लक्ष घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच कपिलच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला. या ऑडिओमध्ये बॉक्सर म्हणतो, “जो सलमानसोबत काम करेल तो मरेल.”

या धमकीचा फक्त कपिलला नाही, तर संपूर्ण बॉलिवूडला परिणाम झाला आहे. हॅरी बॉक्सरच्या ऑडिओमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, “आता आम्ही कोणालाही इशारा देणार नाही. पुढच्या वेळी थेट छातीवर गोळी झाडली जाईल.” मुंबईतील सर्व कलाकार, निर्माता, दिग्दर्शक यांना ही थेट धमकी देण्यात आली आहे. “आम्ही मुंबईचं वातावरण असं बिघडवू की कोणालाही कल्पनाही नसेल,” अशी तीव्र भाषा वापरली गेली आहे.

या धमकीने फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. कपिल शर्माला उद्देशून हॅरी बॉक्सरने म्हटलं की, “जर कोणी सलमानसोबत काम केलं, तो छोटा कलाकार असो वा मोठा, आम्ही कोणालाही सोडणार नाही. आमच्यासाठी कोणताही थर गाठावा लागला तरी आम्ही त्या व्यक्तीला संपवू.”

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अनेक कलाकार आणि निर्माते अधिकृतपणे शांत आहेत, मात्र आतून घबराटीचं वातावरण पसरलं आहे. बिश्नोई गँग आणि सलमान खान यांचं वैर नवीन नाही. काळवीट शिकार प्रकरणापासूनच या दोघांमध्ये शत्रुत्व सुरू आहे. बिश्नोईने याआधीही सलमानच्या घरावर गोळीबार केला होता आणि अनेक वेळा त्याच्या हत्येचा कट आखल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. बिश्नोईची मागणी आहे की, काळवीट प्रकरणात सलमानने त्याच्या समाजाची सार्वजनिक माफी मागावी.

कपिल शर्मावर झालेल्या हल्ल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये भीतीचं सावट पसरलं असून, गँगस्टर बिश्नोईच्या धमक्यांनी फिल्मसृष्टी पुन्हा एकदा धोक्याच्या झोनमध्ये आली आहे. मुंबई पोलिसांकडून तसेच कॅनडाच्या स्थानिक सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


Protected Content

Play sound