मुंबई । आपल्या बिनधास्त मत प्रदर्शनामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत हीने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केल्याने सोशल मीडियात तिच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कंगना म्हणाली की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे? असं कंगना म्हणाली. यावर आता तिच्यावर सोशल मीडियातून टिका केली जात आहे. अनेकांनी तिला यावरून ट्रोल केले आहे.
दरम्यान, भाजप नेते राम कदम यांनी मात्र कंगनाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, वास्तवात महाराष्ट्र सरकार कंगनाला घाबरत आहे. कारण तिने नाव सांगितली तर सर्वांची नावे देशासमोर येतील. त्यामुळे तिला धमकावलं जात आहे. मात्र, राज्य सरकार हे विसरत आहे की संपूर्ण देश कंगनाच्या पाठीमागे उभा आहे. कंगना झाशीची राणी आहे, ती अशा धमक्यांना घाबरणार नाही. तर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनावर टिका केली आहे. ते म्हणाले की, ज्या मुंबईने राहयला घर, खायला अन्न दिलं त्याची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर करणार्या वक्तव्याचा मी निषेध करतो.