Home Cities अमळनेर वाजतगाजत कानबाईचे पांझरा नदीत विसर्जन 

वाजतगाजत कानबाईचे पांझरा नदीत विसर्जन 


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्री कानबाई मातेच्या दोन दिवसीय उत्सवाची सांगता रविवारी कळंबे (जुना गाव दर्जा) येथे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक अहिराणी गाण्यांच्या साथीत भव्य मिरवणुकीने झाली. नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या पुढाकाराने पुनरुज्जीवित झाला.

गेल्या दोन दिवसांपासून गावात कानबाई मातेची प्रतिष्ठापना करून गल्लीबोळात अहिराणी गाण्यांचा गजर सुरु होता. गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. देविसिंग राजपुत व जगदिश राजपुत यांच्या घरी झालेल्या विधिवत पूजनानंतर मातेची मूर्ती मिरवणुकीसाठी नेण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात गावातील मुख्य चौकातून झाली आणि संपूर्ण गावात मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली.

या मिरवणुकीत पारंपरिक अहिराणी गाणी सादर करणाऱ्या महिलांचा विशेष सहभाग होता. महिलांनी फुगड्या खेळत पारंपरिक पोशाखात कानबाई मातेच्या भजनांची रचना करत शोभायात्रेला रंगत आणली. लेझीम पथक, वाद्यवृंद, तसेच नागरिकांनी टाळ मृदंगांच्या ठेक्यावर ठेका धरत उत्सवात सहभागी होत गावातील वातावरण भक्तिभावाने भारावून गेले होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण मातेच्या गजरात हरवलेला दिसला.

कळंबे गावातील नवीन पिढीनेही या उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. मिरवणुकीदरम्यान कानबाईच्या पारंपरिक गीतांवर युवक-युवती, महिला व पुरुष यांनी एकत्र येत नृत्य केले. गावातील अनेक घरांमध्ये आरास सजवण्यात आली होती. मार्गभर देवीच्या जयघोषात भाविकांनी फुलांची उधळण करत मातेचे स्वागत केले.

शोभायात्रेचा समारोप पांझरा नदीत विसर्जनाने झाला. विसर्जनाच्या वेळी नदीतदेखील यात्रेचे स्वरूप आले होते. विसर्जनापूर्वी महिलांनी पुन्हा एकदा पारंपरिक वाद्यांवर गाणी म्हणत देवीला निरोप दिला. नदीत विसर्जन करताना भक्तांनी मातेच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमवला. अनेकांनी हात जोडून मातेचे दर्शन घेतले आणि आपल्या घरी सुख, समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली.


Protected Content

Play sound