जळगाव प्रतिनिधी । एनएसएसचे विशेष हिवाळी शिबिर आपल्याला सामाजिक भान असलेला सजग ‘माणूस’ बनवते. महाविद्यालयातील चार भिंतीपलीकडील शिक्षण या शिबिरातून मिळते, असे मत मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले. मू.जे. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर कडगाव येथे आयोजित केलेले आहे. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर प्रत्येकाला स्वत:ला शिस्त लावून घेण्यासाठीचा प्रशिक्षण वर्ग आहे. यादृष्टीने आपण शिबिराकडे पहिले पाहिजे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मू. जे. महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर दि. २२ ते २८ डिसेंबर २०१९ दरम्यान कडगाव येथे आयोजित केलेले आहे. या शिबिराचे उदघाटन कडगाव येथील जयहिंद विद्यालयाचा अल्पसंख्यांक विद्यार्थी आवेश खाँ नसीर खाँ पठाण याच्या हस्ते बोधिवृक्षाच्या रोपट्याला पाणी देऊन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने महाविद्यालयाचे ऋण व्यक्त केले.
या उदघाटन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर कोल्हे आणि कडगावचे सरपंच हिरामण कोळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश महाले यांनी केले. यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. आर. वसावे, डॉ. उज्वला भिरूड, डॉ. नम्रता महाजन, प्रा. जयश्री भिरूड, प्रा. गोपीचंद धनगर आणि स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन रूपेश पोकळे याने तर आभार याने मानले.
या शिबिरात एक भारत श्रेष्ठ भारत, संविधान दिन ते राष्ट्रीय समरसता दिन यावर प्रबोधन केले जाणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, ग्रामीण विकास, ग्राम वाचनालय असे उपक्रम राबविले जाणार आहेत. या शिबिरात मनोज गोविंदवार यांचे युवाशक्ती, देवयानी गोविंदवार यांचे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, अद्वैत दंडवते यांचे ‘शिक्षण हक्क’, डॉ. सुजाता महाजन यांचे ‘आरोग्य’, डॉ. रागिणी पाटील यांचे ‘अवयवदान:श्रेष्ठदान’, संतोष खिराडे यांचे ‘आपत्ती व्यवस्थापन’ गणेश सोनार यांचे ‘पर्यावरण संवर्धन’ तर जिल्हा उद्योग केंद्रातील राजेंद्र चव्हाण यांचे व्याख्यान होणार आहे. या शिबिरात गावातील चौकात अनेक सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक पथनाट्ये होणार आहेत.