जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीदरम्यान न्यायाला मानवतेची जोड देणारी एक हृदयस्पर्शी घटना घडली. गंभीर अपघातात जखमी होऊन चार वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या अर्जदाराची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी न्यायालयातील न्यायाधीश स्वतः न्यायालयाच्या पायऱ्या उतरून वाहनतळात पोहोचले. या घटनेमुळे न्यायप्रक्रियेत मानवी संवेदनांचा सुंदर प्रत्यय पाहायला मिळाला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दि. १४ मार्च २०२६ रोजी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये विविध प्रकरणांसह रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोष चिंधू शिंदे यांच्या मोटार अपघात दाव्याचीही सुनावणी करण्यात आली. संतोष शिंदे हे जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील रहिवासी असून १५ एप्रिल २०२२ रोजी बैलगाडीने शेतात जात असताना त्यांच्यावर भीषण अपघात ओढवला होता.

शेताकडे जात असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH-26-AD-7797 ने त्यांच्या बैलगाडीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बैलगाडीसोबत असलेले दोन्ही बैल घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले, तर संतोष शिंदे गंभीर जखमी झाले. अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच हात-पायांतील अनेक हाडांना गंभीर दुखापत होऊन अक्षरशः चुराडा झाला. गेल्या चार वर्षांपासून विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून आजही ते अंथरुणावरच खिळून आहेत. सध्या त्यांचे वय ५५ वर्षे असून भविष्यात पुन्हा कामधंदा करून स्वतःच्या पायावर उभे राहणे अत्यंत कठीण असल्याची परिस्थिती आहे.
या अपघातानंतर उपचारासाठी संतोष शिंदे यांच्या कुटुंबावर प्रचंड आर्थिक ओझे आले. गेल्या चार वर्षांत औषधोपचारावर सात ते आठ लाख रुपयांचा खर्च झाला. उपचारासाठी गावकऱ्यांकडून वर्गणी गोळा करावी लागली, नातेवाईकांकडून पैसे उसने घ्यावे लागले तसेच कर्जही काढावे लागले. अपंगत्वामुळे उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नसल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर ट्रक चालक अब्दुल निजाम अब्दुल रहीम व ट्रक मालक शेख मोईददीन शेख इमामुद्दीन (दोघेही रा. नांदेड) यांच्या विरोधात मोटार अपघात दावा प्राधिकरण, जळगाव येथे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्यात आला. संबंधित ट्रक चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमाकृत असल्याने विमा कंपनीलाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले.
अर्जदाराची अत्यंत बिकट परिस्थिती पाहता व उपचारासाठी होत असलेला प्रचंड खर्च लक्षात घेऊन हा दावा लवकरात लवकर निकाली निघावा, अशी मागणी अर्जदाराने आपल्या वकिलांमार्फत केली होती. त्यामुळे हा दावा राष्ट्रीय लोक अदालतीसमोर वर्ग करण्यात आला. दि. १४ मार्च रोजी झालेल्या लोक अदालतीत पॅनल क्रमांक १ चे अध्यक्ष तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. एन. मोरवले आणि पॅनल सदस्य ॲड. स्वाती भोयर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
अर्जदार संतोष शिंदे हे अंथरुणावर असल्याने त्यांना न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर येणे शक्य नव्हते. ही बाब समजताच पॅनलचे अध्यक्ष आणि सदस्य स्वतः न्यायालयातून खाली उतरून जळगाव न्यायालयाच्या वाहनतळात गेले आणि तेथेच अर्जदाराची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांची बाजू ऐकून घेतली. न्यायालयाने दाखविलेल्या या मानवी संवेदनशीलतेमुळे न्यायप्रक्रियेला मानवतेचा स्पर्श मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पवन बनसोडे तसेच तदर्थ जिल्हा न्यायाधीश एम. एस. बढे उपस्थित होते.
न्यायालयातील अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेमुळे भावूक झालेल्या अर्जदाराने न्यायाधीश व वकील वर्गाचे मनापासून आभार मानले. विमा कंपनीसोबत झालेल्या चर्चेनंतर या प्रकरणात अर्जदाराला नुकसानभरपाई म्हणून १६ लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. या रकमेतून अपंगत्वाची पूर्ण भरपाई होऊ शकत नसली तरी उपचारासाठी झालेला काही खर्च भरून निघेल, असे समाधान अर्जदाराने व्यक्त केले.
या प्रकरणात अर्जदारातर्फे ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव आणि ॲड. सुनील चव्हाण यांनी कामकाज पाहिले, तर विमा कंपनीतर्फे ॲड. प्रसाद गोडबोले यांनी बाजू मांडली.



