यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामाकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेकरिता जळगाव जिल्ह्यात येणारे गाव/पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह अचूक माहिती भरून दि.१० जुन २०२४ पर्यंत प्रकल्प कार्यालयात व शासकीय वसतिगृह येथे अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज प्रकल्प कार्यालय यावल व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मुलांच्या शासकीय वसतिगृह येथे विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करावेत.
सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे/विद्यार्थ्याचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या सांक्षांकित दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनु. क्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्ररेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष इतके राहील. (तहसिलदार यांचे चालु वर्षाचेउत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे)
इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे किमान वय ६ वर्ष पुर्ण असावे. विद्यार्थ्यांच्या जन्म दिनांक ०१ जुन, २०१७ ते ३१/१२/२०१८ या दरम्यान झालेला असावा. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला, विद्यार्थ्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच विधवा, घटस्फोट,निराधार, परितक्त्त्या व दारिद्र रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाड्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. (नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन द्यावी लागेल.) विद्यार्थ्याना वर्ग दुसरी प्रवेशासाठी इ.१ ली गुणप्रमाणपत्र सादर करावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. दिलेल्या कालावधी नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यास एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. या सर्वच अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनीच अर्ज सादर करावेत. या निकषामध्ये बसणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता या कार्यालयाकडुन अर्ज मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन, वरीष्ठ कार्यालयाकडुन प्रवेश देण्याबाबत शाळा नावाचे यादीसह आदेश प्राप्त होताच नामांकित निवासी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी कळविले आहे.