जामनेरात मिशन शिष्यवृत्ती अंतर्गत जेटीएस परीक्षा संपन्न

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने “मिशन शिष्यवृत्ती” या उपक्रमांतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जेटीएस (जामनेर तालुका टॅलेंट सर्च परीक्षा) वर्ष 3 रे यशस्वीपणे पार पडली. जामनेरसह तालुक्यातील 13 परीक्षा केंद्रांवर जवळपास २२०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला.

ही परीक्षा जलसंपदा मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन आणि जे.के. फाउंडेशन गोद्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण करणे आणि त्यांना अधिक सरावाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना अशा परीक्षांसाठी तयार करण्याचे महत्त्व ओळखून, जामनेर तालुक्यातील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

जामनेर येथील परीक्षा केंद्रावर नगराध्यक्षा साधनाताई महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे, केंद्रप्रमुख संदीप पाटील, तसेच सुलभक टीमचे सदस्य, विषयतज्ज्ञ शिक्षक आणि पर्यवेक्षक उपस्थित होते.प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि गटशिक्षणाधिकारी तसेच सुलभक टीमच्या कार्याचे गौरवोद्गार काढले. यासोबतच जे.के. फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराबद्दलही त्यांनी आभार मानले.

यावेळी बोलताना उपक्रमाचे आधारस्तंभ श्री. जे.के. चव्हाण यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, शिक्षकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करावे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून यश मिळवावे, असे मार्गदर्शन केले.हा उपक्रम मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आला असून, परीक्षेचा संपूर्ण खर्च जे.के. फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेतून निवडलेल्या 100 विद्यार्थ्यांना पुढील अंतिम परीक्षेसाठी संधी मिळणार असून, त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका सुलभक टीमचे प्रवीण कुऱ्हाडे, शरद वासनकर, कैलास पाटील, योगेश पाटील, हरीश पाटील आणि संदीप पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

Protected Content