पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काही दिवसांपूर्वीच आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शिवीगाळ करून धमकावण्यात आलेले पत्रकार संदीप महाजन यांना टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेच्या हत्येमुळे वातावरण तप्त असतांना पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांनी याबाबत विश्लेषण करत भाष्य केले होते. यात त्यांनी आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख केल्याचा आरोप करत आमदार किशोर पाटील यांनी त्यांना कॉल करून शिवीगाळ करत धमकावले होते. यानंतर त्यांनी आपणच शिवीगाळ केल्याचे मान्य देखील केले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. तर, आपल्या जीवाला आमदार किशोर पाटील यांच्याकडून धोका असल्याने संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी केली होती. तथापि, त्यांना आतापर्यंत संरक्षण देण्यात आलेले नाही. यातच त्यांना मारहाण करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, संदीप महाजन हे काल मोपेडवरून घरी येत असतांना त्यांना चार-पाच जणांनी खाली पाडून बेदम मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात संदीप महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.