बीड, वृत्तसंस्था | ‘ईडी’चा फेरा आणि अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर पुन्हा नव्या जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादीने केज मतदारसंघातून तिकीट दिले होते. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंदडा यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, आता अचानक त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवले आहे.
नमिता या राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. डॉ. मुंदडा यांनीही भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या दोनदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तिनदा त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. त्यांच्या निधनानंतर केजमधून नमिता यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या संगीत ठोंबरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पराभवानंतरही राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा यंदा संधी दिली होती.
राष्ट्रवादी सोडल्यानंतर आता त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यांना केजमधून उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे, असेही सूत्रांकडून समजते. त्यांच्या अचानक पक्षांतरामुळे आता राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली तेव्हा शिवसेनाप्रुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बारामतीतून उमेदवार दिला नव्हता. हा पदरही या मागणीला आहे. पवारांनी शिवसेनेची ही विनंती मान्य केल्यास पवार कुटुंबातील पुढच्या पिढीला म्हणजेच, रोहित पवार किंवा पार्थ पवार यांनाही भविष्यात त्याचा फायदा मिळू शकतो, असाही एक कयास आहे.