Home प्रशासन नगरपालिका अतिक्रमण विरोधात नगर पालिका व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

अतिक्रमण विरोधात नगर पालिका व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाडी चालक आणि शाळा परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर नगर पालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत पोहोचताना होणाऱ्या अडचणींच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यालगतच्या शाळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीची कोंडी वाढली होती. फूटपाथवरील अतिक्रमण आणि रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या हातगाड्यांमुळे विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः परीक्षा काळात विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याने पालक व नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर रावेर नगर पालिका आणि रावेर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करत बसस्थानक परिसरातील काही हातगाडी चालकांवर भारतीय न्याय संहिता कलम 285 अन्वये गुन्हे दाखल केले. संबंधितांना समजपत्र देऊन पुढील कारवाईची सूचना देण्यात आली आहे. वारंवार अतिक्रमण आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, शहरातील दोन प्रमुख शाळांच्या आसपास विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असताना पानटपऱ्यांवर सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार विश्वनाथ महाजन, आकाश बाळु चौधरी,  जफर खान रहेमतुल्ला खान, दिलीप फत्तु बारी, शब्बीर अली शौकत अली, शेख फईम शे. ईब्राहीम, सुनिल रघुनाथ शिस्तुरे पानटपरी चालकांवर शाळा परिसरात तंबाखू विक्रीस बंदी असूनही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही संयुक्त मोहीम पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल गुन्हे शोध पथकातील, पो.हे.कॉ  ईश्वर चव्हाण, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख गजानन बोने, तसेव नगरपालीकेचे सुधीर माळी बांधकाम अभियंता, प्रशांत कोकाटे, नितेश चांगरे अभिजीत लबडे, युवराज मोयर, निलेश महाजन, तुषार रायपुरकर, योगेश भोई, वाजीद खान, गणेश रणसिंगे  यांच्या सहभागाने राबविण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढेही अशा कारवाया सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound