जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला मिळत होत्या. यावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने गुरूवार २० मार्च रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेच्या काळात संयुक्तपणे धडक मोहीम राबवली. जळगाव व एरंडोल तालुक्यात गिरणा नदी परिसरात कारवाई करत ४ ट्रॅक्टर आणि सुमारे ५० हुन ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
एरंडोल तालुक्यातील रवंजा गावात महसूल पथक कारवाई करत असताना ट्रॅक्टर मालकाने तलाठी नितीन पाटील यांच्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते जखमी झाले. ही घटना घडताच ट्रॅक्टर मालक राजू कोळी फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेदरम्यान, जप्त केलेले ट्रॅक्टर नेत असताना स्टेअरिंग लॉक झाल्याने ते पुलावरून खाली कोसळले. जेसीबी आणि क्रेनच्या माध्यमातून ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला. या घटनेत सुदैवाने चालक थोडक्यात बचावला.
जळगाव आणि एरंडोल तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या गिरणा नदीत दोन्ही बाजूंनी अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जळगाव प्रांताधिकारी विनय गोसावी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावातीत यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत विशेष मोहीम राबवण्यात आली.
यामध्ये, जळगाव तालुक्यातील खेडी, आव्हाने आणि एरंडोल तालुक्यातील रवंजा गावात महसूल आणि पोलिसांनी नदीत उतरून थेट कारवाई केली. या मोहिमेत ४ ट्रॅक्टर आणि मोठ्या प्रमाणात वाळू जप्त करण्यात आली. या मोहिमेमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेली वाहने आणि वाळूचा साठा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.