मुंबई (वृत्तसंस्था) जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) तोंड झाकून हल्ला करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे असून हा हिंसाचार पाहून मला २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
जेएनयूतील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तोंड लपवून हल्ला करणारे हे घाबरट आहेत. हल्ल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर २६/११ दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी सांगितले. तोंड लपवून हल्ला करणाऱ्यांचे चेहरे उघडे झाले आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील तरूण-विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा शब्दातही मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे.