नवीदिल्ली, वृत्तसंस्था | दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात रविवारी रात्री मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. चेहरा झाकून आलेल्या हल्लेखोरांनी लाठया-काठयांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला चढवला. विद्यापीठाच्या आवारात झालेल्या या भीषण हल्ल्यात २० पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये नेमके काय घडले ? विद्यार्थ्यांना कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावा लागलं ते आता हळूहळून समोर येत आहे. ‘आज तक’ने अशाच काही विद्यार्थ्यांशी बोलून त्यांचे अनुभव जाणून घेतले.
प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी काय म्हणतात…
१ जेएनयूमध्ये पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिवम चौरसियावर रस्त्यावरुन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झाल्याने डॉक्टरांनी आपल्याला टाके घातले असे शिवम चौरसियाने सांगितले. हा सर्व वाद रजिस्ट्रेशनवरुन झाल्याचे शिवमचे म्हणणे आहे. टाके घातल्यानंतर शिवमला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनेक सदस्य जखमी झाल्याचे त्याचे म्हणणे आहे.
२ एबीवीपीचा सदस्य असलेला मनीष सुद्धा पीएचडीचा विद्यार्थी आहे. रॉडने हल्ला करण्यात आल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचे त्याने सांगितले.
३ जेएनयूमध्ये एम-फीलचे शिक्षण घेणारा शेषमणि सुद्धा या हल्ल्यात जखमी झाला. त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून हाताला प्लास्टर घालण्यात आले आहे. हल्लेखोरांनी हाता-पायावर लोखंडी रॉडने प्रहार केल्याचे शेषमणिने सांगितले.
जेएनयूमध्ये मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. लेफ्ट समर्थक विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार घातला होता. सेमिस्टरसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. पण लेफ्ट समर्थक विद्यार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करु देत नव्हते. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे होते. त्यांचे वाय-फाय कनेक्शन कापण्यात आले. ज्यांनी ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारहाण झाल्याचे शेषमणीने सांगितले. लेफ्ट समर्थक ५०० ते ६०० विद्यार्थ्यांनी हल्ला केला त्यामध्ये जामियाचे सुद्धा विद्यार्थी होते असे शेषमणीने सांगितले.
४ जेएनयूची विद्यार्थिनी असलेल्या गीताने सांगितले की, हल्लेखोरांनी साबरमती बॉईज हॉस्टेलच्या सर्व खोल्यांवर हल्ला केला पण एबीवीपीच्या विद्यार्थ्यांच्या खोल्यांना हातही लावला नाही.
५ जेएनयूमध्ये एम फिलचे शिक्षण घेणारी प्रियंका म्हणाली की, तिथे जमाव आधीपासूनच होता. संध्याकाळी आंदोलन होणार होते. अनेकजण गोदावरी बस स्टँडजवळ गोळा झाले, त्याचवेळी हाणामारी सुरु झाली. आताही घरातून फोन येत असून ते पुन्हा माघारी बोलवत आहेत. १०० नंबर डायल केल्यानंतरही मदत मिळाली नाही.
रविवारी संध्याकाळी ५.०० वाजल्यानंतर जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. चेहरा झाकून आलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थी, शिक्षकांवर हल्ला केला व विद्यापीठाच्या आवारात तोडफोड केली.