नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हिंसाचार प्रकरणी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनयू प्रशासनाकडून तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी १९ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हल्लातील जखमी विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्ली क्राईम ब्रॅचची टीम जेएनयू कॅम्पसमध्ये दाखल झाली आहे.
जेएनयूत रविवारी काहीजणांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर अनेकांनी टीका केली होती. त्याआधी फी वाढ विरोधी आंदोलन जेएनयू विद्यार्थी संघटनेने पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून सबमिशन्स, परिक्षांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर चार जानेवारी विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड जेएनयू विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप होता. पाच जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने ह्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. अखेर आज पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषसह १९ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.