जेएनयू हल्ला : गेट वे ऑफ इंडियावरील आंदोलन आता आझाद मैदानावर

Jnu

 

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे जेएनयू हिंसाप्रकरणी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पर्यटकांना त्रास होत असल्याचं सांगत आझाद मैदानात आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच आंदोलनाला परवानगी नसल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे. येथील सर्व विद्यार्थ्यांना आता तिथून हटवण्यात आले आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनामुळे परिसरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या वाढली होती. सामान्य मुंबईकर आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आंदोलकांनी ही जागा रिकामी करावी, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यानंतरही आंदोलक ठाण मांडून राहिल्याने अखेर हस्तक्षेप करत त्यांची रवानगी आझाद मैदानात करावी लागली आहे, असे उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी सांगितले.

गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलन अधिक उग्र होत असतानाच पोलिसांनी आज सकाळी त्यात हस्तक्षेप केला. पोलिसांनी आंदोलकांना जागा रिकामी करण्यास सांगितले. मात्र काही आंदोलकांनी त्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमधून त्यांची आझाद मैदानात रवानगी केली. दरम्यान, गेट वे ऑफ इंडिया तसेच आझाद मैदान येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Protected Content