जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वल्लभदास वालजी वाचनालयाच्या सभागृहात बुधवार, २४ ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राजू बाविस्कर लिखित ‘काळया निळ्या रेषा’ या पुस्तकाचे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
‘राजू बाविस्कर यांच्या लेखनात आक्रमताळेपणा नसून प्रांजळपणे लेखन केले आहे. त्यांनी नवा नायक दिला आहे.’ असे मत यावेळी डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी समारंभात मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांची गाणी सुदीप्ता सरकार, मंजुषा भिडे, हर्षदा कोल्हटकर यांनी सादर केले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, कवी अशोक कोतवाल, कवी रमेश पवार आणि भारती बाविस्कर यांची उपस्थिती होती. सत्यजित साळवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
पुस्तक प्रकाशनानंतर भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते राजू बाविस्कर यांच्या पत्नी भारती बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजू बावीसकरांच्या पुस्तक तसेच कलेच्या प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगेश कुलकर्णी अभिजीत पाटील ओंकार पाटील, प्रसेन बावीस्कर, सुनीला भोलाने यांनी परिश्रम घेतले.