जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 49 तक्रारी अर्ज दाखल झालेत.
यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व बालविकास विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनास, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, विशेष भूसंपादन अधिकारी डी.एन.घोंगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.के.गायकवाड, महसूल, जिल्हा परिषद, परिवहन, पोलीस, जिल्हा नियोजन, समाज कल्याण आदि विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे , यांनी 2019 या वर्षाभरात लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रारींचा आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
तसेच डिसेंबर 2019 पासून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी प्रत्येक तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यास सुरूवात झालेली आहे. या लोकशाही दिनास संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. तालुकास्तरीय लोकशाही दिनात आपल्या विभागाशी संबंधित प्राप्त तक्रारी स्विकारून निपटारा लवकरात लवकर करावा. तालुकास्तरावर आयोजित लोकशाही दिनात तक्रारदारांना आपल्या तक्रारींचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही असे वाटल्यास ते तक्रारदार जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपल्या तक्रारी दाखल करू शकतील. असेही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपस्थित अधिकारी आणि तक्रारदारांना सांगितले.
त्याचप्रमाणे नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारीच लोकशाही दिनात मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेर गावाहून नागरीक येत असतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित रहावे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील. त्यांचेवर कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आजच्या बैठकीत दिला.