जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदला म्हणून मुंदखेडा व पातोंडा येथील संबंधित शेतकऱ्यांना तीन टप्प्यात 38.22 कोटी रुपयांचा मोबादला अदा करण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तापी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाने ही तडजोड केली. याशिवाय तापी खोरे विकास महामंडळाने 205 प्रकरणांध्ये सुमारे 160 कोटी रुपयांची तडजोड केली आहे.
भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांनी दाखविलेल्या संयम, समजदारी आणि भूसंपादन करणाऱ्या यंत्रणांनी दाखविलेल्या सहकार्यामुळे लाभ देणे शक्य झाले, असे जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी सांगितले. शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळविताना संयम व प्रशासनावर विश्वास दाखवावा, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी व भूसंपादन अधिकारी यांच्यात मध्यस्थीमुळे तसेच अटी व शर्तीच्या पूर्ततेमुळे भूसंपादितांना लाभ मिळालेला आहे, अशा भावना भूसंपादित शेतकऱ्यांच्या वकिलांनी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी.बी.चौधरी, ॲड. एन.आर.लाठी, तापी महामंडाळाचे कार्यकारी संचालक श्री.कुलकर्णी, ॲड.के.एच.ठोंबरे, जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके आदींनी मार्गदर्शन केले. ॲड. देवप्रसाद पाटील, ॲड. केतन ढाके, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.