बुलडाणा प्रतिनिधी । जिल्ह्याच्या सिंचनात भर घालण्यासाठी जिगाव प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी नागपूर येथील विधान मंडळातील मंत्री परिषद सभागृहात बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिगाव प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी नियमित तरतुदी व्यतिरिक्त अतिरिक्त निधी देण्यासाठी शासन सकारात्मक असून प्रकल्प पूर्णत्वासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीसाठी जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत.
या प्रकल्पाच्या संदर्भात मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. असे मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
बुलडाणा शहर खडकपूर्णा पाणीपुरवठा योजना व शहरातील अपूर्ण अवस्थेतील नाट्यगृह पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शहर पाणीपुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करावी. तसेच नाट्यगृह बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात यावी. जिल्ह्यात मंजूर असलेली कामे संथगतीने सुरू असल्यास ती गतीने पुर्ण करण्यात येतील. खामगांव-जालना रेल्वे मार्ग प्रकरण रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर बोर्डाकडे प्रलंबित आहे. याबाबतची प्रक्रिया गतीने पूर्ण करून राज्य शासन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तयार आहे.
प्रकल्पास सुधारणा असल्यास दुरुस्त
सिंदखेड राजा व लोणार विकास आराखडा पूर्ण करण्याच्या कार्यवाही करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री म्हणाले, सिंदखेड राजा व लोणार हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय आहे. सिंदखेड राजा विकास आराखड्यासंदर्भात करण्यात आलेल्या ‘डिझाईन’चे सादरीकरण मंत्रालयात मला दाखवावे. यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींना सुद्धा बोलवावे. त्यामध्ये काही सुधारणा करायच्या असल्यास त्या जरूर करू, तसेच लोणार सरोवर परिसरात स्वच्छता राखवी. पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा आराखड्यातंर्गत देण्यासाठी काम करावे. हे दोन्ही आराखडे पूर्ण करण्यात येतील. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी मदत द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
खा. न्यायलय इमारतीचे संवर्धन
चिखली व खामगाव येथील टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यास शासन सकारात्मक आहे. या ठिकाणची सद्यस्थिती बघून निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील पोलीस वसाहतींची कामे पूर्ण करण्यात येतील. खडकपूर्णा जलसिंचन उपसा सौर उर्जा प्रकल्प पूर्ण करावा. पेनटाकळी प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जळगाव, जामोद ते नांदुरा रस्त्यावरील रेल्वे ओव्हर ब्रीजच्या निधीची परिस्थिती तपासून पाहावी. या प्रकल्पासाठी राज्याच्या निधीचा हिस्सा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. खामगाव न्यायालयाच्या 100 वर्ष पूर्ण झालेल्या इमारतीचे संवर्धन करून ही इमारत वैशिष्टयपूर्ण करावी.
मागणी, प्रश्न आणि सुचना
याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा सर्वे हा विमा कंपन्यांनीदेखील ग्राह्य धरावा. सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी निधी देवून आराखड्यातील कामे पूर्ण करण्यात यावी, बुलडाणा शहर पाणीपुरवठा योजनेत फिल्टर प्लँन्ट बसविण्यात यावा. तसेच जिल्ह्यात कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पिक कर्ज वितरण करण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी आमदार यांनी आप-आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले. प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी संबंधित विषयासंदर्भात याठिकाणी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सादरीकरण केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी गृह मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार प्रतापराव जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार डॉ.संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, ॲड आकाश फुंडकर, आ.श्वेताताई महाले, डॉ. राजेंद्र शिगणे, आ.राजेश एकडे, प्रधान सचिव भुषण गगराणी, विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदींसह विविध विभागांचे सचिव, विभागप्रमुख, आणि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.