जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारी व्यक्ती म्हणजे गुरू – प्रा.डॉ. राहुल निकम

maharaj

चोपडा प्रतिनिधी । गुरु हा दोन अक्षरी शब्द असून जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी व्यक्ती म्हणजे गुरु होय. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती म्हणजे गुरू होय. गुरु हा दीपस्तंभाप्रमाणे असतो. जीवनाच्या महासागरात आपली नौका भरकटू नये म्हणून मार्गदर्शक असतो. शिष्यामधील स्वच्छ प्रतिमा जागृत करण्याचा प्रयत्न गुरु करतात. माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे शहाणपणात, जगण्याच्या मूल्यात रूपांतरण करण्याचे काम गुरु करतात, असे गुरूचे माहात्म्य प्रा. डॉ. राहुल निकम यांनी सांगितले.

येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात गुरुपाैर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत ही होते. यावेळी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. चौधरी, पर्यवेक्षक डी. एस. शुक्ल, शिक्षक एस. बी. पाटील हे होते. यावेळी बोलतांना चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. निकम म्हणाले, का? कुठे? कसे? केव्हा? ही जिज्ञासा जागृत करण्याचे काम करतात. गुरु विद्यार्थ्यांमधील संवेदशीलवृत्ती जागृत करण्याचे काम करतात. जगामध्ये गुरु शिष्याची अखंड आणि उज्वल परंपरा आहे. आजच्या काळात दैववादाला मूठमाती देऊन विज्ञानवाद शिकवणारा, मुलाना अंध:कारापासून दूर घेऊन जातो त्याला शिक्षक गुरु म्हणावे. पुस्तकांना, ग्रंथांना, श्रेष्ठ पुरुषांना गुरु मानावे. विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थीदशेत आपले आदर्श निश्चित करावे आणि त्यांच्या मार्गावर वाटचाल करावी. ‘गुरु म्हणजे ज्ञान मंदिराचा उंच कळस, गुरु म्हणजे आमच्या अंगणातली पवित्र तुळस’ या काव्यपंक्ती यावेळी त्यांनी उधृत केल्या.  प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात येऊन गुरुवंदना गायली गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.पी. महाले यांनी केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Protected Content