जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील हिरागौरी पार्क येथील अपार्टमेंटमधील बंद घर फोडून १ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत बुधवारी १४ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोविंदा हिलाल पाटील (वय-४१) रा. हिरागौरी पार्क, निमखेडी शिवार जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. विमा प्रतिनिधी म्हणून ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान ते घर बंद करून बाहेर गेलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले. गोविंदा पाटील हे रात्री ८ वाजता घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.