अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानक आवारात दोन प्रवाशी महिलांच्या पर्समधून सुमारे १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरूवार २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, भारती राजेंद्र धनगर वय ४७ रा. वर्डी ता. चोपडा या महिला कामाच्या निमित्ताने गुरूवार २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानक आवारात आलेल्या होत्या. त्यावेळी बसस्थानकात पुष्पा अरून देसले या महिला देखील होत्या. दोघांच्या पर्समधून एकुण १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार दोन्ही महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बसस्थानक आवारातील संपुर्ण परिसरात माहिती घेतली. परंतू दागिन्यांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत शिरसाठ हे करीत आहे.