Home क्राईम मंगल कार्यालयातून अडीच लाखांचे दागिने लांबविले !

मंगल कार्यालयातून अडीच लाखांचे दागिने लांबविले !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एका मंगल कार्यालयातील कार्यक्रमातून महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स अज्ञात चोरट्याने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील बालाजी हॉल येथे हा प्रकार घडला. या चोरीत सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ येथील प्रल्हाद नगर भागातील रहिवासी उज्वल प्रबोध भावे (वय ५०) या आपल्या कुटुंबीयांसह शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बालाजी हॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या गडबडीत आणि नातेवाईकांशी बोलत असताना त्यांनी आपल्याजवळील पर्स शेजारीच असलेल्या सोफ्यावर ठेवली होती. या पर्समध्ये सोन्याचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज होता.

दरम्यान, उपस्थित गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने सोफ्यावर ठेवलेली ही पर्स शिताफीने चोरून नेली. काही वेळानंतर भावे यांना आपली पर्स जागेवर नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली, मात्र ती मिळून आली नाही. मंगल कार्यालयातून अशा प्रकारे दागिने चोरीला गेल्याने कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर त्यांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. उज्वल भावे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.


Protected Content

Play sound