बुलढाणा येथे जेष्ठागौरी उत्सव (व्हिडीओ)

bulthana

बुलढाणा प्रतिनिधी । शहरात जेष्ठागौरीचे आज आवाहन करण्यात येत असून गौरी मातेच्या आगमनाचा शुभ मुहूर्त सकाळी 6:05 मिनिट ते सायंकाळी 6:34 असा आहे. महाराष्ट्रात विविध पद्धतीने ज्येष्ठागौरी पूजन उत्सव साजरा केला जातो. तसेच विवाहित स्रियांसाठी हा जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा सण असल्याचे देखील म्हटले जाते.

याबाबत अधिक माहिती अशी की, गौरी माता म्हणजेच साक्षात माता पार्वतीचे रूप. गौरी आवाहन निमित्ताने गौरी मातेचे आगमन होत असते. यामुळे सुरू असलेला गणेशोत्सवात आणखीनच आनंदमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. तर ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत असते. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे देखील म्हटले जाते.

गौरी मातेची स्थापना

यंदा गौरी आवाहन आज 5 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. प्रत्येकजण परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून गौरी घरात आणली जाते. त्यानंतर, ज्या महिलेच्या हातात गौरी असते, त्या स्त्रीचे पाय दुधाने व पाण्याने धुतले जातात. त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी मातेची स्थापना होणार त्या जागेपर्यंत लक्ष्मीचे पायांचे ठसे उमटवले जातात.,गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. यामुळे गौरी मातेचा आशिर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते.

याचबरोबर, काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. मांग समाजात उभ्या लक्ष्मी मांडण्याची पद्धती आहे. तसेच गौरी आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केले जाते. या दिवशी जेष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा करत फराळाचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात. आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. त्याचसोबत तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते. परंतु गौरी विसर्जनापूर्वी दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची करुणेचा भाव दिसून येते असे मानले जात.

Protected Content