Home क्रीडा जेडीसीडीएतर्फे जळगावात हिवाळी क्रिकेट महाकुंभाचे आयोजन

जेडीसीडीएतर्फे जळगावात हिवाळी क्रिकेट महाकुंभाचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील संगणक, सीसीटीव्ही आणि आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणत व्यवसायाबरोबरच मैत्री, समन्वय आणि आरोग्याचा संदेश देणारी जेडीसीडीए अर्थात जळगाव जिल्हा कॉम्प्यूटर डीलर्स असोसिएशनतर्फे हिवाळी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, ३१ जानेवारी आणि रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील संगणक व सीसीटीव्ही विक्रेते, फेरविक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक आणि सेवा देणाऱ्या संस्थांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या जेडीसीडीएच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. यावर्षीच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून प्रामा इंडिया या उच्च दर्जाचे, संपूर्ण भारतीय बनावटीचे आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही उत्पादन करणाऱ्या अग्रगण्य कंपनीने सहभाग घेतला आहे.

या क्रीडा महोत्सवात Epson Printer, Lenovo Laptop, Npav Antivirus, Zebronics Peripheral, Evteq Security CCTV, Brother Printer, Sarvadnya Computer आदी नामांकित कंपन्यांचे संघ सहभागी होणार आहेत. एकूण आठ संघांमध्ये साखळी सामने खेळवले जाणार असून, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेत सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार असून, विजेता संघ, उपविजेता संघ आणि उत्कृष्ट संघासाठी आकर्षक सांघिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेमुळे खेळाडू म्हणून सहभागी झालेले आयटी क्षेत्रातील व्यावसायिक वर्षभरातील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करतात. पारदर्शक व्यवसाय, परस्पर सहकार्य आणि माहितीची देवाण-घेवाण या माध्यमातून सुमारे ४०० सदस्य एकमेकांशी संपर्क साधतात. स्पर्धेच्या निमित्ताने विविध कंपन्यांच्या उत्पादनांची, उपकरणांची आणि नव्या तंत्रज्ञानाची पुन्हा एकदा उजळणी होते.

यावेळी कंपनीचे विक्री प्रतिनिधी आणि जळगाव जिल्ह्यातील छोटे-मोठे संगणक व आयटी व्यावसायिक यांचा थेट संवाद साधला जातो. व्यवसायातील अडचणी, विक्री वाढवण्यासाठीचे उपाय, दरातील तफावत, उपकरणांची वैशिष्ट्ये तसेच विक्री पश्चात सेवेतील त्रुटी यावर मोकळेपणाने चर्चा होते. त्याचबरोबर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, चपळता आणि उत्तम आरोग्यासाठी खेळाचे महत्त्वही उपस्थितांवर अधोरेखित केले जाते.

दरम्यान, ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी सर्व कंपन्यांचे विक्री व सेवा प्रतिनिधी तसेच असोसिएशनचे सदस्य यांच्यासाठी बी-टू-बी स्वरूपाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला सुमारे २०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यामुळे व्यावसायिक सहकार्याला अधिक चालना मिळणार आहे.

अग्रगण्य कंपन्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. अंतिम सामना संपल्यानंतर रविवार, १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता पारितोषिक वितरण समारंभासह स्पर्धेचा समारोप होणार आहे.

जेडीसीडीएचे अध्यक्ष अनिल शिरसाळे, उपाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, खजिनदार तुषार चौधरी तसेच पदाधिकारी सचिन दुनाखे, योगेश चौधरी, शरद चव्हाण आणि श्याम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. यावर्षीच्या क्रिकेट कमिटीचे चेअरमन प्रीतम लाठी तर प्रचार-प्रसार समितीचे प्रमुख पंकज पवनीकर यांनी ही माहिती दिली.


Protected Content

Play sound