Home Uncategorized JBCL 2025 सीजन 2 स्पर्धेचे यशस्वी आयोजन; ‘रे फाउंडेशन’ विजेतेपदावर विराजमान

JBCL 2025 सीजन 2 स्पर्धेचे यशस्वी आयोजन; ‘रे फाउंडेशन’ विजेतेपदावर विराजमान


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावमधील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरलेली जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025 (JBCL सीजन 2) ही स्पर्धा 16 आणि 17 ऑगस्ट रोजी गोरजाबाई टर्फवर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. IT DigiTech Solutions यांच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंना एकत्र आणत एक सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यात आले.

यंदाच्या JBCL स्पर्धेत 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. खेळाडूंची निवड ग्रेडनिहाय समान संख्येने केल्याने सर्व संघ हे तुल्यबळ बनले होते, त्यामुळे प्रत्येक सामन्यात चुरस आणि उत्कंठा पाहायला मिळाली. या नियोजनामुळे स्पर्धेची गुणवत्ता अधिकच वाढली. प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आणि दोन दिवस गोरजाबाई टर्फवर क्रिकेटचा रंगतदार माहोल अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक ठरला. यामध्ये रे फाउंडेशन संघाने आपली सरस कामगिरी कायम ठेवत JBCL 2025 चे विजेतेपद पटकावले. ट्रिपगुरु टूरिझम संघाने उपविजेतेपदावर समाधान मानले. महाजन बेकर्स यांनी तृतीय तर स्पार्टन संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

JBCL सीजन 2 च्या यशस्वी आयोजनासाठी अक्षय पाटील, गणेश पाटील, हितेश मराठे, माही जाधव, स्वप्नील पाटील, ऋषिकेश पाटील, कल्पेश बाविस्कर, राहुल कदम व त्यांचा मित्र परिवार यांनी अथक मेहनत घेतली. आयोजनाची आखणी, नियोजन, स्पर्धेचे वेळापत्रक, खेळाडूंची निवड, सामन्यांचे संचालन या प्रत्येक बाबतीत त्यांनी अत्यंत काटेकोर व्यवस्था ठेवली होती. तसेच, स्पॉन्सरच्या सहकार्यामुळे स्पर्धेच्या आयोजनाला बळ मिळाले.

JBCL चा दुसरा सीजन केवळ एक खेळ स्पर्धा न राहता, जळगावातील तरुणाईसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरला आहे. विविध समाजघटकांतील खेळाडूंना एकत्र आणत मैत्री, एकोपा आणि आरोग्यपूर्ण स्पर्धेचे दर्शन या उपक्रमातून घडले.


Protected Content

Play sound