जयंत पाटलांचे मन सध्या कशातच लागत नाही; मुश्रीफ यांच्या दाव्याने खळबळ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मनस्थितीबाबत नवा गौप्यस्फोट झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्या मनात सध्या अस्थिरता असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, खुद्द जयंत पाटील यांनीच नागपुरात त्यांना हे सांगितल्याचा उल्लेख मुश्रीफ यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार गटात नाराज असल्याच्या चर्चांना वेग आला होता. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगली दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. तसेच, काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा देखील होती. अशा पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या विधानामुळे या चर्चांना नव्याने चालना मिळाली आहे.

हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्याशी नागपुरात झालेल्या संवादाचा खुलासा करताना सांगितले की, “जयंत पाटील यांनी स्वतः मला सांगितले होते की, ‘माझे मन सध्या कशातच लागत नाही.’ कदाचित सत्तेबाहेर राहून पक्ष टिकवण्याच्या आव्हानाची जाणीव त्यांना झाली असावी किंवा त्यांचे मनपरिवर्तन झाले असावे. त्यांचे मनपरिवर्तन झाले आहे का, हे त्यांनाच विचारावे लागेल.”

जयंत पाटील यांनी बुधवारी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी “माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका” असे सूचक विधान केले. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय दिशा काय असेल, याबाबत चर्चा अधिक गडद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्यावर भाष्य करताना सांगितले की, “मी शेतकऱ्यांसोबत आहे, पण शेतकरीच आपली भूमिका बदलणार असतील, तर माझा नाईलाज आहे.” तसेच, संजय राऊत यांनी महामार्ग प्रकरणी काही आरोप केले असल्यास ते पुराव्यानिशी सिद्ध करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हसन मुश्रीफ यांनी धनंजय मुंडे यांच्या रिक्त मंत्रिपदाबाबतही भाष्य केले. “सध्या धनंजय मुंडे यांचे खाते अजित पवारांकडे आहे. चौकशीनंतर ते निर्दोष ठरल्यास त्यांचे खाते त्यांना परत द्यावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, भाजप आमदार नीतेश राणे यांच्या इतिहासासंदर्भातील वादग्रस्त विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी लवकरच नीतेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. ते माझे चांगले मित्र आहेत,” असे मुश्रीफ यांनी सांगितले.

जयंत पाटील यांच्या मनातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ते कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात राहूनच ते पक्ष संघटन मजबूत करतील की नव्या राजकीय वाटचालीकडे वळतील, हे लवकरच स्पष्ट होईल.

Protected Content