सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | साता-यातील एका बड्या भाजपा नेत्याच्या घरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रविवारी सकाळी साताऱ्यातील भाजपा नेते मदन भोसले यांच्या घरी जयंत पाटलांनी भेट दिली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्का देण्याची खेळी शरद पवार खेळत आहेत. त्यात कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील समरजितसिंह घाटगे यांना पक्षात आणून पवारांनी भाजपाला दे धक्का दिला आहे. अशातच जयंत पाटील यांनी बंद दाराआड मदन भोसले यांच्याशी चर्चा केली. यात मदन भोसलेंना शरद पवारांसोबत येण्याचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जाते.
मदन भोसले यांचे वाई तालुक्यात वर्चस्व आहे. वाईमधील विद्यमान आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत गेले. महायुतीत ही जागा त्यांना सोडली जाऊ शकते. त्यामुळेच मदन भोसले आणि जयंत पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. मदन भोसले यांच्या भेटीनंतर जयंत पाटील हे त्यांच्या घरातून हसत-हसत बाहेर पडले. मात्र भेटीत काय चर्चा झाली याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला. भाजपामधील सर्व जण माझे मित्र आहेत असे सांगत त्यांनी इतर तपशील बोलण्याचा टाळला. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विविध रणनीती आखत आहे. त्याचाच भाग म्हणून पक्ष सोडून गेलेले आमदार आणि त्यांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्वाचा विचार यातूनच नाराज नेत्यांना पक्षात घेण्याचा चंग पवारांनी बांधला आहे.