डोंबिवली, वृत्तसंस्था | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे येथील एकमेव आमदार प्रमोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहराची दुरावस्था आणि त्यासाठी जबाबदार एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच “मला कोणतीही टीका करायची नाही. पण, मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. आता त्यांनी डोंबिवली शहरावर लक्ष द्यावे,” असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोलाही लगावलाय.
“डोंबिवलीच्या प्रदुषणाला आणि अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी”, अशी मागणी करत याबाबत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. “राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख होती. पण हे शहर आता प्रदूषणाचे शहर म्हणून ओळखले जाते. गेल्या २५ वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली शहरात प्रदूषण वाढतंय.
अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, नाले तुंबणे यासाठी हेच अधिकारी जबाबदार आहेत. याबाबत आम्ही सतत आंदोलन करुनही आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही”, असा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. तसेच, “केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही काही वर्षांपूर्वी डोंबिवलीला बकाल शहर असे संबोधून देखील इथल्या महापालिका अधिकाऱ्यांनी त्या नाराजीच्या वक्तव्यातून कसलाच बोध घेतला नाही, ही या शहरांमधील नागरिकांची शोकांतिका आहे. येथील यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात वर करतायेत. त्यामुळेच इतर संस्थांना पुढे येऊन नालेसफाई करावी लागते”, असे म्हणत राजू पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
तसेच, “डोंबिवली शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे. येथे प्रचंड प्रदूषण आहे. त्यावर तुम्ही तरी लक्ष द्या. या अधिकाऱ्यांवर लक्ष द्या. जर आम्ही गेलो, तर आमच्यावर कलम ३५३ अंतर्गत तक्रारी होतात. याबाबत आंदोलन किती वेळा करणार त्यालाही मर्यादा असते. मला कोणतीही टीका करायची नाही. पण मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत, डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे आणि डोंबिवली शहर सुधारावे. कारखानदारांना महानगर गॅस परडवत नसेल तर राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा व त्यांना सवलत (सबसीडी) द्यावी आणि तातडीने प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत”, अशीही मागणी आमदार पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठवलेल्या दुसऱ्या पत्राद्वारे केली आहे.