पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणे मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यात भव्य सभा होणार असून यात ते नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा आता निर्णायक टप्प्यात आलेला आहे. त्यांनी आरक्षणासाठी पहिल्यांदा उपोषण करून समाजबांधवांचे एकत्रीकरण केले. यानंतर आंतरवली सराटी येथे ऐतीहासीक विराट सभा घेऊन आरक्षणासाठी रणशिंग फुंकले. विशेष बाब म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्याला शक्य झाली नाही तितकी समाजबांधवांची गर्दी जमवून त्यांनी संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष वेधून घेतले. यानंतर आज पुण्यात जरांगे पाटील यांची दुसरी सभा होत असून ती देखील तितकीच भव्य होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सभा सुरू होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असणार्या शिवनेरी किल्लयावर अनवाणी जाऊन आशीर्वाद घेतले. यानंतर आज खेड राजगुरू नगरात जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. तर दुपारून ते थेट पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असणार्या बारामतीमध्ये सभा घेणार आहेत. या दोन्ही सभांमध्ये ते सत्ताधार्यांवर कडाडून प्रहार करण्याची शक्यता आहे. यात ते नेमके काय बोलणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.