मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागाने सोमवार, 23 जानेवारीपासून हप्त्याची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची अधिकृत माहिती दिली आहे. सोमवारी रात्रीपासून अनेक महिलांना रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत असल्याने लाभार्थींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाकडे 98 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. निधी प्राप्त झाल्यानंतर तातडीने लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. महिला व बाल विकास विभागाने यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिला आहे.

डिसेंबर 2025 महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याच्या 14 तारखेच्या सुमारास महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर महिन्याचा हप्ता सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यानंतर लाभार्थींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने सर्व लाभार्थींना 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये करण्यात आली तेव्हा सुमारे 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी नोंदणीकृत होत्या. त्यानंतर ई-केवायसी सक्तीमुळे 1 कोटी 90 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली. त्यापैकी योग्य माहिती भरलेल्या 1 कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला. त्यामुळे पात्रता व कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतरच निधी वर्ग केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत आवश्यक सुधारणा करून लाभार्थींना पुढील हप्त्यांचा लाभ घेता येणार आहे. प्रशासनाकडून महिलांना योग्य मार्गदर्शनही करण्यात येत असल्याची माहिती आहे.
जुलै 2024 पासून जानेवारी 2026 पर्यंत विचार केल्यास लाभार्थी महिलांना एकूण 19 हप्त्यांची रक्कम प्राप्त झाली आहे. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपयांची अतिरिक्त मदत दिली जात आहे.



