विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेच्या बोगस दाखल्यांची चौकशी सुरू (Video)

भुसावळ प्रतिनिधी । विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेने बोगस दाखले तयार केल्या प्रकरणी जनसंग्राम बहुजन मंचने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी जनसंग्रामतर्फे करण्यात आली आहे.

येथील श्री विठ्ठल रुखमाई अर्बन को-ऑप सोसायटीने २००४ ते २०१५ या काळात सहकार विभागाचे बनावट सही शिक्के वापरून ११६ बोगस वसुली दाखले तयार केल्याची जनसंग्राम ठेवीदार संघटनेने राज्याचे सहकार आयुक्त यांना डिसेंबर २०१९ मध्ये तक्रार होती.संस्थेने या बोगस वसुली दाखल्यांच्या नावाखाली कर्जदार,जामीनदार व काही एक संबंध नसलेल्या मालमत्ता धारकांची फसवणूक केली,सहकार कायद्यात तरतूद नसतांना काही कर्जदारांवर खोटे गुन्हे दाखल केले या सर्व मुद्द्यांची चौकशी करून यातील तथ्याच्या आधारे संस्थाचालक यांच्यावर ई.डी.अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीत जनसंग्रामचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी केली होती.या प्रलंबित तक्रारीची सहकार आयुक्त यांच्या आदेशाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी दखल घेऊन सहाय्यक निबंधक जे.बी.बारी यांना चौकशी अधिकारी प्राधिकृत केले होते. त्यानुसार अलीकडेच तालुका सहकार कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली होती. यात नमूद काळात संस्थेकडील कलम १०१ नुसार सहाय्यक निबंधक यांनी दिलेले वसुली दाखले व कलम १००/८५ नुसारचे जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयातील मालमत्ता लिलावाच्या व संस्थेच्या नावावर करण्याच्या प्रक्रियेची सर्व कागदपत्रे संस्थेने सादर करावीत तसेच विठ्ठल रुखमाई संस्थेच्या प्रस्तावित ई. डी. च्या कार्यवाहीची मूळ नस्तीची नक्कल सुनावणीच्या कामकाजात हजर करण्याची
मागणी तक्रारदार श्री.ठाकरे यांनी केल्यावरून रोजनाम्यात तशी नोंद करण्यात आली आहे.
पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल असा निर्णय प्राधिकृत अधिकारी जे.बी.बारी यांनी दिला.

दरम्यान,श्री.विठ्ठल रुखमाई पतसंस्थेच्या बोगस वसुली दाखल्यांमुळे पीडित कर्जदार,जामीनदार व मालमत्ताधारक यांच्या वेगवेगळ्या तक्रारी असल्याने संस्थेवर वेळेत आणि परिणामकारक कारवाई होत नसल्याने सर्व पीडित एकत्र येऊन जनसंग्राम संघटनेच्या तक्रारीत व सुरू असलेल्या चौकशीत सहअर्जदार होऊ शकतात. त्यासाठी अशा सर्व पीडितांची एकत्रित बैठक येत्या ,१३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केली आहे.बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात येईल.तरी या याप्रकरणात ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा सर्वांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2659402307609294

Protected Content