फैजपूर/सावदा प्रतिनिधी । अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनासाठी तापी-पूर्णा संगमाचे पवित्र जल व संत मुक्ताई समाधीस्थळातील माती जनार्दन हरीजी महाराज यांनी श्रीराम जन्मभुमी ट्रस्टकडे सुपूर्द केली आहे.
याबाबत वृत्त असे की, अयोध्या येथे भव्य श्री राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. याचे भूमिपुजन ५ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात येणार आहे. यासाठी देशभरातील मोजक्या मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले असून यामध्ये फैजपूर येथील सत्पंथ मंदिराचे गादीपती तथा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा समावेश आहे. या मंदिराच्या भूमिपुजनाला देशभरातील तीर्थक्षेत्र व पवित्र नद्यांच्या संगमाचे पाणी तसेच देव स्थानांच्या परिसरातील मातीचा वापर केला जाणार आहे. या अनुषंगाने जनार्दन हरीजी महाराज हे तापी-पुर्णा नदीच्या संगमावरील पवित्र पाणी आणि संत मुक्ताई समाधी मंदिर परिसरातील माती आपल्या सोबत घेऊन अयोध्या येथे गेले आहेत.
जनार्दन हरीजी महाराज आज अयोध्या येथे पोहचले आहेत. त्यांनी राम जन्मभूमि ट्रस्टला पवित्र जल व माती सुपुर्द केली. यासोबत चांदीची वीट, डायमंड व दान राशी देखील त्यांनी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज व महामंत्री चंपत राय यांच्याकडे सुपुर्द केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत इंदूर येथील राधे बाबा हे देखील होते.