जामनेर येथील ‘त्या’ व्यापारी संकुलाची पाहणी

जामनेर प्रतिनिधी । येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या बीओटी व्यापारी संकुलासंदर्भात तक्रारीबाबत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने जामनेर येथे जाऊन संकुलाची पाहणी केली.

सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी जामनेर येथील जि.प. शाळेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या बीओटी व्यापारी संकुलाबाबत तक्रार केली आहे. या संकुलात शासनाच्या अटीशर्तींचा भंग करून कंत्राटदाराने तब्बल २०० कोटी रूपये कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणात तातडीने चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ही समिती जिल्हा परिषदेत येऊन गेली. यानंतर सोमवारी ही समिती दुसर्‍यांदा जिल्ह्यात आली. समितीचे अध्यक्ष मनिष सांगळे, सदस्य राजन पाटील, लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक अधिकारी यांना घेऊन ही समिती जामनेर येथील व्यापारी संकुलाची पाहणी करण्यासाठी गेली होती. या समितीने व्यापारी संकुल आणि उर्दू शाळेची पाहणी केली.

संबंधीत समितीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. यामुळे आता बीओटी व्यापारी संकुलाप्रकरणी नेमका काय अहवाल येणार व त्यावरून काय कारवाई होणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Protected Content