जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील गारखेड्याजवळ भरधाव ट्रकने पॅजो रिक्षाला दिलेल्या धडकेतील ठार झालेल्यांची संख्या तीनवर गेली असून अजून हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, एमएच १९-६०४५ क्रमांकाचा लाकडाने भरलेला आयशर ट्रक हा जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात होता. तर समोरून प्रवाशांनी भरलेली एमएच १९ एई-९१५८ क्रमांकाची रिक्षा येत होती. गारखेडा या गावाजवळ भरधाव वेगाने येणार्या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले होते. तर तिसर्याचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजून तीन जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातामध्ये तानाजी शंकर साळवी (रा. कल्याण); तारासिंग जयसिंग पाटील (रा. नाशिक) आणि शेख आवेश शेख अमिनुद्दीन ( रा. जामनेर) या तिघांचा मृत्यू झाला असून त्यांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे. तर इतरांवर जामनेर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी आपल्या सहकार्यांसह अपघातस्थळी धाव घेऊन आपल्या वाहनातून जखमींना रूग्णालयात दाखल केले होते. तर परिसरातील नागरिकांनीही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.