जामनेर प्रतिनिधी । शहरातील एका किराणा एजन्सी मधून टाटा कंपनीच्या बनावट मिठाचा तब्बल १४ लाख रूपयांचा साठा मुंबई येथील तपास पथकाने जप्त केला आहे.
याबाबत वृत्त असे की, जामनेर येथील मयूर किराणा दुकानातून बनावट टाटा मिठाची विक्री होते अशी माहिती कंपनीच्या अधिकार्यांना मिळाली. त्यावरून कंपनीने बनावट मालावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या मुंबई येथील आय.पी. इन्व्हेस्टिगेशन प्रायव्हेट लिमिटेडला माहिती दिली. त्याबाबत तपास पथकाने एक डमी ग्राहक कावडिया यांच्या दुकानात पाठवला. त्याने खरेदी केलेल्या गोणीतील मीठ बनावट असल्याची खात्री पटताच दुकानात छापा टाकला. त्यावेळी बनावट मिठाच्या १४ गोण्या पंचनामा करून जप्त केल्या.
यानंतर जळगाव रोडवरील बाजार समितीच्या गाळा क्रमांक आठमध्ये असणार्या राजकुमार कावडिया यांच्या मालकीच्या कोमल एजन्सीजमध्येही बनावट मिठाचा साठा असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी १४०० गोण्या आढळून आल्या, त्याही जप्त केल्या. ही कारवाई मुंबई येथील आय.पी. इन्व्हेस्टिगेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जावेद पटेल, अब्दुल्ला खान, अनिल मोरे, सन्वेश उपाध्याय, मोहंमद चौधरी यांच्या पथकाने केली. त्यांना पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, संदीप पाटील, तुषार पाटील, नीलेश घुगे यांनी मदत केली.