हुबळी-वृत्तसेवा | येथे झालेल्या 2025-26 च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरने कर्नाटकवर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवत तब्बल 66 वर्षांची प्रतीक्षा संपवली. सामना अनिर्णित राहिला असला तरी पहिल्या डावातील भक्कम आघाडीमुळे नियमानुसार जम्मू आणि काश्मीरला विजेते घोषित करण्यात आले.
जम्मू आणि काश्मीरने प्रथम फलंदाजी करत 584 धावांचा भक्कम डोंगर उभारला. शुभम पुंडीरने 121 धावांची संयमी आणि दर्जेदार खेळी करत संघाच्या डावाला कणा दिला. त्याला हसन (88), कर्णधार पारस डोगरा (70), अबुल समद (61), कन्हैया वाधवान (70) आणि साहिल लोत्रा (72) यांनी मोलाची साथ दिली. या एकत्रित प्रयत्नांमुळे संघाला मजबूत आघाडी घेता आली.

प्रत्युत्तरात कर्नाटकचा डाव 293 धावांवर आटोपला. दबावाखाली कर्नाटकची फलंदाजी कोसळली. मयंक अग्रवालने 160 धावांची झुंजार खेळी करत लढा दिला, मात्र त्याला अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही.
पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरने दुसऱ्या डावात 4 बाद 342 धावा करून डाव घोषित केला. सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला, मात्र निकाल अनिर्णित राहिला. रणजी ट्रॉफीच्या नियमानुसार अंतिम सामना ड्रॉ झाल्यास पहिल्या डावात आघाडी असलेला संघ विजेता ठरतो — आणि त्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या नावे ऐतिहासिक किताब नोंदवला गेला.
संपूर्ण स्पर्धेत वेगवान गोलंदाज आकिब नबीने आपल्या भेदक गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. त्याने 10 सामन्यांत 12.56 च्या सरासरीने तब्बल 60 बळी घेत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. सात वेळा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम करत त्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा विजय केवळ एका सामन्याचा निकाल नसून जम्मू आणि काश्मीर क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. खेळाडूंच्या जिद्दी, संघभावना आणि नियोजनबद्ध कामगिरीमुळे संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
66 वर्षांनंतर मिळालेल्या या यशामुळे जम्मू आणि काश्मीरमधील क्रिकेटप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, हा विजय पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.



