जामिया हिंसा : देशात फुट पाडण्याचा प्रयत्न – मोदी

1552108584 modi111

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात हिंसाचार सुरु आहे. यावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. ‘नागरिकत्व कायद्यामुळे भारतातील कुठल्याही धर्माच्या नागरिकाचे नुकसान होणार नसून कुणीही घाबरू नका, यासंदर्भात काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवत असून देशामध्ये फूट पडू देऊ नका, शांतता राखा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा नुकताच संसदेत मंजूर करण्यात आला. मात्र, नागरिकत्व देताना मुस्लिमांना वगळण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्यास विरोध होत आहे. ईशान्येकडच्या राज्यांनी सामाजिक समतोल बिघडून जाण्याच्या भीतीने आंदोलन सुरू केले आहे. तर, जामिया मिलिया व अलीगड मुस्लिम विद्यापीठातही विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे. या प्रश्नी विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज एका मागोमाग एक ट्विट केले आहेत. ”हा हिंसाचार दु्र्दैवी आणि वेदनादायी आहे. वाद, चर्चा आणि विरोध हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, विरोध नोंदवण्यासाठी हिंसाचार करणं ही आपली परंपरा नाही. नागरिकत्व कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमतानं संमत केला आहे. देशातील बहुतेक पक्ष व त्यांच्या खासदारांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. हा कायदा म्हणजे भारतीय संस्कृतीच्या स्वीकारार्हता, सौहार्द, करुणा व बंधुत्वाच्या मूल्यांचं प्रतीक आहे,’ असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Protected Content