जळगावात घरफोडी; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास

chor

जळगाव प्रतिनिधी । शहरातच असलेल्या मावस भाच्याच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या लॉन्ड्री व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी 11 हजाराची रोकड व दागिणे असा 69 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी समोर आली आहे.

प्रेमचंद माणकचंद परदेशी रा. कचरा फॅक्टरीरोड, पवार पार्कजवळ हे पत्नी कांचन परदेशी यांच्यासह वास्तव्यास आहे. रिंगरोडवरील चिरायु हॉस्पिटलजवळ सुपर ड्रायक्लिन नावाची लाँड्री असून त्याच्यावर ते उदरनिर्वाह भागवतात. प्रेमचंद परदेशी यांचे मावस मेव्हणे राकेश टेकचंद परदेशी रा. प्रेमनगर यांचेकडे 10 रोजी मावस भाच्याचे हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी परदेशी दाम्पत्य सायंकाळी 6.30 वाजता प्रेमनगर येथे गेले. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यावर रात्री 11 दाम्पत्य नवीपेठेतील परदेशी यांचे लहान भाऊ पुनमचंद माणकचंद परदेशी यांचकडे मुक्कामी थांबले. बुधवारी सकाळी 10.30 प्रेमचंद परदेशी यांना शेजारी पुतण्या कार्तिक शिवलाल परदेशी यांचा फोन आला. फोनवर त्याने दरवाजाचे कुलूप तोडलेले असल्याची माहिती दिली. परदेशी यांनी घर गाठले असता, घरातील सामान अस्ताव्यस्त तसेच घरातील लोखंडी कपाट, लॉकर ड्रावर उघडे दिसले.

चोरट्यांनी परदेशी यांच्या घरातून 33 हजार रुपये किमतीचे एक तोळे सोन्याचे डोरले, 1 ग्रॅम सोन्याचे मणी, 15 हजार रुपयांची 5 ग्रॅमचे कानातले टोंगले, 9 हजार रुपयांची 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 1500 रुपयांच्या 5 भारच्या चांदीच्या साखळ्या, 300 रुपयांचे चांदीचे आकडे व 11 हजार रुपयांची रोकड असा एकूण 69 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी प्रेमचंद परदेशी यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content