जळगाव प्रतिनिधी | शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात अडसर बनलेल्या विजेचे खांब आणि तारांचे स्थलांतर करण्यासाठी दीड कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यासाठी नगरविकास खात्याने मान्यता दिली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने आता या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी विजेचे खांब आणि तारांच्या स्थलांतरामुळे याला ब्रेक लागला आहे. तर, हे काम सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येत असल्याने यासाठी महापालिकेचा निधी खर्च करण्यात अडचणी येत होत्या. यामुळे हा रस्ता महापालिकेकडे वर्ग करून यासाठी दीड कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. यासाठी महापौर आणि उपमहापौरांसह पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले होते.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन दीड कोटी रूपयांचा निधी या कामासाठी वर्ग करण्याची मंजुरी मिळविली. यामुळे आता या पुलाच्या परिसरातील विजेचे खांब आणि तारांचे स्थलांतर सहजपणे होणार असून अर्थातच, पुलाच्या कामाला देखील गती मिळणार आहे.