जळगाव प्रतिनिधी | सहकार खात्यातर्फे पोलीस बंदोबस्तात आठ अवैध सावकारांच्या घरावर छापे टाकल्यानंतर या पथकाला अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या असून आता या प्रकरणी काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यातील सावदा, कुंभारखेडा आणि तासखेडा (ता.रावेर), आचेगाव (ता.भुसावळ) तसेच यावल येथील आठ अवैध सावकारांविरुद्ध ४ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने आठ पथकांची निर्मिती करून काल एकाच वेळी या सावकारांच्या निवासस्थानी छापे टाकले. साधारणपणे सकाळी साडेदहाला सुरू झालेले हे छापासत्र दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चालले.
याच्या अंतर्गत एकाच वेळी सावदा, यावल, रावेर, भुसावळ तालुक्यात आठ अवैध सावकारांवर छापेमारी करून घरांची झडती घेतली. यात नंदकुमार मुकुंदा पाटील रा.बुधवारपेठ सावदा, सुदाम तुकाराम राणे रा.बुधवारपेठ सावदा, मधुकर तुकाराम राणे रा.बुधवारपेठ सावदा, मुरलीधर काशिनाथ राणे रा.कुंभारखेडा ता.रावेर, श्रीधर गोपाळ पाटील रा.आचेगाव ता.भुसावळ, रमेश भादू इंगळे व सुनंदा रमेश इंगळे दोन्ही रा.तासखेडा ता.रावेर यांच्या घरावर पथकांनी छापे मारले. तर याप्रसंगी मुरलीधर तोताराम भोळे रा.भास्करनगर यावल व सुधाकर मुकुंदा पाटील रा.बुधवारपेठ, सावदा या दोन सावकारांची घरे बंद असल्याचे आढळून आले.
सहा अवैध सावकारांच्या घरांवर केलेल्या छापेमारीत आक्षेपार्ह २३ खरेदी खत, दोन सौदा पावत्या, साठेखत व रजिस्टर्स पथकांनी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या सामग्रीचा पंचनामा करण्यात आला आहे. याचे अवलोकन करून संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत काही दोष आढळून आल्यास संबंधीत अवैध सावकारांना नोटीस देण्यात येईल. त्यावर सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यात येईल. जप्त केलेल्या कागदपत्रानुसार शेती, घर सावकारांनी बळकावलेले असल्यास ते शेतकर्यांना परत करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपनिबंधकांनी दिली आहे.
ही कारवाई जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे सहायक निबंधक विजयसिंह गवळी, सहायक निबंधक मंगेशकुमार शहा, चोपड्याचे सहायक निबंधक संजय गायकवाड, अमळनेरचे सहायक निबंधक किशोर पाटील, पाचोर्याचे सहायक निबंधक नामदेव सूर्यवंशी, एरंडोलचे सहायक निबंधक गुलाब पाटील, जामनेरचे सहायक निबंधक जगदीश बारी, चाळीसगावचे सहायक निबंधक प्रदीप बागुल यांच्या पथकांनी केली.