जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जळगावमध्ये जोरदार आंदोलन छेडण्यात आले. बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली आयोजित या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा तिसरा टप्पा आज जळगाव शहरात पार पडला.
आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. “महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे!”, “बुद्ध गया अॅक्ट १९४९ हा काळा कायदा रद्द करा!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पंचशील ध्वज आणि महाबोधी महाविहाराची प्रतिकृतीही मोर्चात सहभागी झालेल्यांचे लक्ष वेधून घेत होती.
बौद्धगयातील महाबोधी महाविहारावर बौद्धांचा नैसर्गिक हक्क असूनही बिहार सरकारने बुद्ध गया अॅक्ट १९४९ अंतर्गत हिंदू व्यवस्थापनाच्या ताब्यात दिला आहे. या विरोधात १२ फेब्रुवारीपासून भिक्खू संघाने आंदोलन सुरू केले आहे. मात्र, सरकारने कोणतीही सकारात्मक दखल घेतली नसल्याने बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम यांनी राष्ट्रीय आंदोलनाची हाक दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष अरुण जाधव, भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मुकेश नेतकर, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक सुनील देहेडे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या मुस्लीम सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.