जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एसटी कर्मचार्यांचा संप मिटून सर्वत्र सुरळीत बससेवा सुरू झाली असतांनाही आसोदा आणि भादली येथे बसेस नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून या प्रकरणी आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून जळगावहून आसोदा आणि भादली येथे बससेवा नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. कोरोनानंतर इतर ठिकाणी बसेस सुरू झाल्या. मध्यंतरी कर्मचार्यांच्या संपामुळे पुन्हा बससेवा बंद झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बसेस सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत. तथापि, आसोदा व भादली मार्गावर अद्यापही बससेवा सुरु करण्यात आली नाही. या दोन्ही गावांमधील लोकांना दैनंदिन कामासाठी जळगावला जावे लागते. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज आणि क्लासेसला जावे लागते. यातच आता लग्नसराई सुरु असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून लोकांना खासगी वाहनानेच प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, आठ गावांची वाहतूक असलेल्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने या मार्गावरील बसेस तात्काळ सुरु कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या मार्गावरील ग्रामस्थांनी सोमवारी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना दिला आहे. निवेदन देतांना किशोर चौधरी, शरद नारखेडे, खेमचंद महाजन, उमेश बाविस्कर, जितेंद्र भोळे. संजय पाटील, संजय ढाके, मिलींद चौधरी आदींसह दोन्ही गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.