जळगाव प्रतिनिधी | एरंडोल ते म्हसावदच्या दरम्यान एकाची कार अडवून तब्बल ७ लाख ९० हजार रूपयांची रोकड लंपास करणार्याला मध्यप्रदेशातील भोपाळ येथून अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाना नथ्थू पाटील यांची कार अडवून दरोडेखोरांनी कारसह ७ लाख ९० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना एरंडोल ते म्हसावद दरम्यान ७ मार्च रोजी घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हे कृत्य दीपक साहेबराव चव्हाण, तुकाराम दिनकर पाटील यांच्यासह दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले होते.
तुकाराम दिनकर पाटील उर्फ सोनू उर्फ मोघ्या (वय २९, रा. सामनेर, ता. पाचोरा) याने दीपक साहेबराव चव्हाण व आणखी दोन जणांच्या मदतीने नथ्थू पाटील यांची कार अडवून त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर दोघांनी पाटील यांची कार ताब्यात घेत चौघे दरोडेखोर दोनही कार घेऊन पळून गेले. पाटील यांच्या कारच्या डिक्कीत ७ लाख ९० हजार रुपयांची रोकडदेखील होती. अशा प्रकारे ७ लाख ९० हजार रुपयांची रोकड व ४ लाख ६० हजाराची कार असा १२ लाख ५० हजारांचा ऐवज लांबवला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यापूर्वी दीपक चव्हाण याला अटक केली आहे. तर गुन्हा घडल्यापासून पोलीस तुकाराम पाटील याच्या मागावर होते. दरम्यान, तो मध्यप्रदेशातील भोपाळ आपल्या सासुरवाडीला जाऊन राहत होता. ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, हेमंत पाटील यांच्या पथकाने भोपाळ येथे जाऊन तुकारामला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.