जळगाव प्रतिनिधी | शहरातील समनानगरातील वास्तव्यास असणारे रंगकर्मी संजय निकुंभ यांच्या पत्री शेडवजा घरावर झाड कोसळल्याने याची हानी झाली आहे. यात सुदैवाने निकुंभ पिता-पुत्राला इजा झाली नाही.
याबाबत वृत्त असे की, शहरातील बालनाट्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जुने जाणते रंगकर्मी संजय निकुंभ यांच्या समता नगर परिसरातील धामणगाव वाडा भागातील पार्टीशन वजा पत्रीघरावर अतिवृष्टीदरम्यान अंगणातील झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. घराच्या आतील खोलीवर मागील बाजूस राहणार्या श्री.तडवी यांच्या अंगणातील झाड वादळी पावसाने कोसळले. या दुर्घटनेत संजय निकुंभ हे त्यांच्या कुटुंबियांसह थोडक्यात बचावले आहे. झाड कोसळण्याच्या काही क्षण आधी संजय निकुंभ तांदूळ धुण्यासाठी म्हणून घराबाहेर आले होते. झाड कोसळल्याने संजय निकुंभ यांच्या घराचा सरा तुटून पत्रे व दगडगोटे घरावर पडून त्यांच्या संपूर्ण घराचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढील खोलीत बसलेले संजय निकुंभ यांचे वडील थोडक्यात बचावले आहे. झाड कोसळल्यानंतर निकुंभ यांच्या परिवाराला आजूबाजूच्या राहिवाशांनी तातडीने मदत करुन सहकार्य केले. तसेच त्यांच्या तात्पुरत्या निवार्याची सोय केली आहे.